Join Whatsapp Group

Join Telegram Group

मराठवाड्यातील युवक-युवतींसाठी 23 व 24 फेब्रुवारीला लातूर येथे विभागीय भव्य नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर

ऑनलाईन नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ कार्यान्वित

राज्य शासनाने प्रत्येक महसुली विभागामध्ये नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील युवक-युवतींसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर आणि विभागीय नमो महारोजगार मेळावा अनुक्रमाने 23 व 24 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर येथे होणार आहे. या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता https://nmrmlatur.in हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. तरी मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यातील युवक-युवतींनी रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी या संकेतस्थळवर ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन राज्याचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लातूर शहरातील महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर आयोजित नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच रोजगार, स्वयंरोजगारातील नवीन संधींची ओळख करून देण्यात येणार आहे. यामध्ये 23 फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन शिबीर होणार आहे. तसेच 24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महारोजगार मेळाव्यात विविध उद्योजक, व्यावसायिक प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्याकडे असलेल्या रिक्त पदांच्या संख्येनुसार युवक-युवती यांची मुलाखतीद्वारे निवड करतील.

23 फेब्रुवारीला मार्गदर्शन शिबिरातून मिळणार करिअरच्या नवीन वाटांची माहिती

दहावी, बारावी किंवा पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय, स्वयंरोजगाराच्या संधी, करिअरच्या नव्या वाटांची माहिती युवक-युवतींना व्हावी, यासाठी नमो महारोजगार मेळाव्याच्या पहिल्या दिवशी, 23 फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित आणि तज्ज्ञ व्यावसायिक, उद्योजक यांचे मार्गदर्शन होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), कृषि उद्योग, पर्यटन, आर्थिक गुंतवणूक, नर्सिंग यासारख्या विविध क्षेत्रातील रोजगार, स्वयंरोजगारातील संधीविषयी व्याख्यान, चर्चासत्र आदी कार्यक्रम होतील. तसेच रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी विविध शासकीय विभाग, बँकामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहितीही दिली जाणार आहे.

24 फेब्रुवारी रोजी भव्य महारोजगार मेळाव्यातून रोजगाराच्या संधी

नमो महारोजगार मेळाव्यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यातील विविध ठिकाणहून उद्योजक उपस्थित राहून शैक्षणिक पात्रता व मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करणार आहेत. यासाठी 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 पासूनच लातूर शहरातील बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता दहावी, बारावी, तसेच विविध विषयातील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय (सर्व ट्रेड) आदी शैक्षणिक पात्रताधारक उमेदवार या मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकणार आहेत.

रोजगार मेळाव्यासाठी येथे करा ऑनलाईन नोंदणी

मराठवाड्यातील युवक-युवतींनी लातूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिरात उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करावी. ऑनलाईन नाव नोंदणीसाठी  https://nmrmlatur.in  हे संकेतस्थळ (क्यू आर कोडसह) कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये ‘उमेदवार’ पर्याय निवडून लॉगीन करावे. त्यानंतर वैयक्तिक माहिती, ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक, आधार क्रमांक, महास्वयंम नोंदणी क्रमांक यासह इतर माहिती भरून छायाचित्र, सी.व्ही. (बायोडाटा) अपलोड करावा.

Leave a Comment